“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरण उचलून धरलं आहे. या प्रकरणावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ‘संसदेत पेगासस प्रकरणावर चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे.

पण देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकारकडे वेळ नसेल, तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारवर आरोप केले. पेगॅससचा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे इतर मंत्र्यांनी तिथे असण्याने फरक पडत नाही. पंतप्रधानांनी ते ऐकलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

सरकारला पेगॅससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते. विरोधी पक्षांकडून त्यांना ते ऐकावं लागेल त्याच्याबाबत सरकारला धास्ती आहे. पण सत्ताधाऱ्यांनी सत्य ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे. विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असतो. त्याचं ऐकणं लोकशाहीत बंधनकारक असलं तरी केंद्र सरकार याबाबत सतत माघार घेताना दिसतंय, असं राऊतांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा