“देशात जी स्थिती आहे. ती पाहून तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही.” : दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. “देशात जी स्थिती आहे. ती पाहून तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. केंद्राने तर डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, पण आम्ही तसं करु शकत नाही,” अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रावर संताप व्यक्त केला आहे.

उच्च न्यायालयात अमिकस क्यूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत अनेक लोकांना ऑक्सिजन मिळत नसल्यानं आपला जीव गमवावा लागत आहे. काही जागांवर ऑक्सिजनचा साठा केला जाऊ शकतो. जेणेकरुन ऐनवेळी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा सल्लाही अमिकस क्यूरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला दिला आहे.

यावर महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनची गरज भागत असेल तर महाराष्ट्रातील काही टँकर दिल्लीला पाठवले जाऊ शकतात, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यावर केंद्राने सांगितलं की, आम्ही उच्च न्यायालयासमोर अहवाल सादर करत आहोत. आम्ही या तथ्यापर्यंत जाणार नाही की 700 MT चा पुरवठा केला जावा की ऑक्सिजनचा बाकी कोटा पूर्ण केला जावा.

ऑक्सिजनच्या मुद्द्यावर सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, दिल्लीचा अद्याप गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रविवारी दिल्लीला 440 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, दिल्लीचा कोटा हा 590 टन इतका आहे. इतकच नाही तर सध्या दिल्लीतील ऑक्सिजनची मागणी आता 976 मेट्रिक टन इतकी बनली असल्याचंही सिसोदिया म्हणाले.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई लढण्यासाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची मागणी केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना त्याबाबत एक पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात ऑक्सिजन आणि रुग्णालय उभारण्याची मागणी केलीय.

“राजधानी दिल्लीसाठी शक्य होईल तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले जावेत. त्याचबरोबर DRDO मध्ये ज्या प्रमाणे एका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार अजून काही रुग्णालयांची उभारणी करण्यात यावी,” अशी मागणी सिसोदिया यांनी पत्राद्वारे राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा