“पराभव आहेच, पण पश्चिम बंगालमध्ये फसवणूक झाली”, चंद्रकांत पाटलांनी केला आरोप!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला जनतेनं एकहाती सत्ता दिल्याचं स्पष्ट झालं असताना आता महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडून भाजपावर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम बंगालमधील पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव मान्यच आहे. पण पश्चिम बंगालमध्ये फसवणूक झाली. डावे आणि काँग्रेसने आपली मतं तृणमूलच्या पारड्यात टाकली. त्यामुळे तिथे भाजपा विरुद्ध सर्व अशी लढत झाली”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालची निवडणूक भाजपा आणि तृणमूल अशा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपाकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री अशा अनेकांच्या सभा प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये झाल्या. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. पायाला दुखापत होऊन देखील व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी पूर्ण राज्यात प्रचारसभा घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता निकालांचं परीक्षण केलं जाऊ लागलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाची अनेक दिग्गज मंडळी प्रचाराला जाऊन देखील पक्षाला विजय मिळवता आला नाही, अशी टीका आता होऊ लागली आहे. मात्र, हा दावा चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. “दु:ख तर वाटणारच. पण आम्ही पक्ष कार्यकर्ते असतो. त्यामुळे आम्ही सगळीकडे जातो. मोदीजी, अमित शाह नेते आहेत म्हणून ते सगळीकडे गेले. आम्ही निवडणुका गंभीर्याने घेतो. पण लोकशाहीत फसवणूक होतेच, ती बंगालमध्ये झाली. भाजपाला पराभूत करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये सगळे एकत्र आले. तरी देखील आम्हाला बऱ्याच जागा मिळाल्या आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा