त्यांनी गर्दी जमवली नाही, शिवसेनेच्या मंत्र्याला शिवसेनेच्याच मंत्र्याकडून क्लीनचिट!

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. याप्रकरणात भाजपने शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. तब्बल 15 दिवसांनी वनमंत्री संजय राठोडांनी समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझी, माझ्या कुटुंबाची तसेच माझ्या समाजाची कृपा करुन बदनामी करु नये अशी विनंती राठोडांनी यावेळी केली.

मात्र, आज ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते. बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्याप्रमाणावर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेनेच्याच मंत्र्याने केराची टोपली दाखवल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. सामान्यांसाठी वेगळे व मंत्र्यांसाठी वेगळे नियम आहेत का ? असा सवाल करण्यात येत होता. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियम मोडणाऱ्यांना फटकारलं आहे. ‘कोव्हीड संदर्भातील नियम जे सर्वांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे पोहरादेवीतील उपस्थितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिलाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र या प्रकरणात संजय राठोडांना क्लीनचिट दिली आहे. संजय राठोड यांनी तिथं गर्दी केली नाही. ते तिथं देवदर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणाऱ्यांवर चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. तिथं गर्दी करण्यामागे संजय राठोड आणि मंदिरातील महंत जबाबदार नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून शरद पवार नाराज असल्याची चर्चा होत होती, मात्र संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शरद पवार कोणीही नाराज नसल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.