दारूबंदी उठवण्यासाठी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आले!

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दारूबंदी उठवण्याला विरोधकांचा आणि सामाजिक संघटनांचा विरोध होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या ६ वर्षांपासून म्हणजेच २०१५ सालापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आली आहे. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी ३० हजार निवेदनं आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. यामध्ये दारूबंदी का उठवली जावी, या कारणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली. दारूबंदीपूर्वी म्हणजे २०१०-२०१४ या काळात १६ हजार १३२ गुन्हे दाखल झाले होते. दारूबंदीनंतर म्हणजे २०१५-२०१९ या काळात ४० हजार ३८१ गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदीपूर्वी एक हजार ७२९ महिला गुन्हेगारीची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये ४०४२ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्याही वाढली.

चंद्रपूरमधील दारूबंदी ही तेथील शेकडो ग्रामपंचायतींनी केलेले ठराव, हजारो महिलांचा मोर्चा ही लोकभावना लक्षात घेऊन केली होती. अवैध दारूविक्री व त्याबाबतचे गुन्हे वाढत असल्याने दारूबंदी रद्द करत असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारने आपल्या अकार्यक्षमतेची कबुलीच दिली आहे, असे चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा