Uddhav Thackeray | “घरी बसून जे केलं ते सूरत, गुवाहाटीला जाऊन नाही जमलं”; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर ताशेरे

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात सत्तासंघर्षांची लढाई अद्यापही सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धुनष्यबाण हे शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाकडून चांगलीच आक्रमकता दाखवण्यात आली. त्यानंतर सेनेचा हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर ताशेरे ओढले आहेत. आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली होती. तेव्हापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाला गळती लागली ती अद्यापही थांबली नाही. यावरुनही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावलं आहे.

“घरी बसून जे केलं ते सूरत, गुवाहाटीला जाऊन नाही जमलं”

“माझ्यावर अनेकांनी टीका केली. घरी बसून सरकार चालवलं अरे होय घरी बसून का होईना मी सरकार चालवलं. घरी बसून मी जे करु शकलो ते सूरत गुवाहटी, दिल्लीला जाऊन करु शकत नाही त्याला मी काय करु शकतो”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचलं आहे.

“त्यांच्यावर एकतर भाजपमध्ये जा नाहीतर तुरुंगात जा अशी आज परिस्थिती झाली आहे. आज कोर्टात लढाई सुरु आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. देवावर विश्वास आहे. लोकशाहीच्या चार आधारस्तंभापैकी तिनाची विल्हेवाट लागलेली आहे. या परिस्थितीत एक आशेचा किरण आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray Criticize Shinde Group

“राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पाला ‘पंचांमृत’ असं गोड नाव दिलं आहे. आता ‘पंचांमृत’ म्हटल्यानंतर हातावर पळीभर पाणी दिलं जातं. त्याने कोणाचंही पोट भरत नाही. ‘पंचांमृत’ या शब्दाचा अर्थ लोकांनी समजून घेतला पाहिजे. कोणालाही आम्ही पोटभर देणार नाही. तुमच्या हातावर जेवढं पडेल तेवढं प्या आणि उर्वरित डोक्यावरून फिरवा, असा त्याचा अर्थ होतो. असा विचित्र अर्थसंकल्प या सरकारने जाहीर केला आहे. या ‘पंचांमृता’तील काही थेंब या सरकारी कर्मचाऱ्यावर उडवायला काहीही हरकत नव्हती”, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like