Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Uddhav Thackeray | पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी होळी, धुलिवंदनानिमित्त नुकतच एक वक्तव्य केलं होतं. मुंबईत धुलिवंदनाच्या निमित्ताने भाजपच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी विरोधी पक्षाला शुभेच्छा देताना केलेल्या एका वक्तव्यावरून आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आम्ही विधानसभेत सांगितलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिलाय. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांच्या भेटीला आले असताना फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर (Uddhav Thackeray’s Replied to Devendra Fadnavis)

“त्यावर मी काय बोलू. जे त्यांच्यासोबत गेलेले नाहीत, असे राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक, अनिल परब यांच्यावर ज्या धाडी चालू आहेत, त्या सूडामध्ये येत नाहीत का? सूडाने पेटून तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत आहात. मी खेडच्या सभेत सांगितलं की, कुटुंबच्या कुटुंब टीका करून बदनाम करायची, उद्ध्वस्त करायची. तरीही ती उद्ध्वस्त नाही झाली तर लाळघोटेपणाने परत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं हेच मेघालयमध्ये दिसलंय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“तिथं भाजपची स्थिती केविलवाणी”

“कोनराड संगमांच्या विरुद्ध मोदी आणि अमित शाहांनी अत्यंत घाणेरडा अपप्रचार केला होता की, ‘मेघालय हे देशातलं सगळ्यात भ्रष्ट राज्य आहे. केंद्राच्या अनेक योजना मेघालयमधल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतच नाहीत. संगमांनी गरीबांचा पैसा खाल्लेला आहे’, पण आता जणूकाही काही झालंच नाही अशा अत्यंत लाचार आणि केविलवाण्या पद्धतीने पुन्हा त्याच संगमांच्या बाजूला जाऊन बसलेत. केविलवाण्या पद्धतीने यासाठी कारण तिथे भाजपची स्थिती केविलवाणी आहे. एक का दोनच आमदार निवडून आले आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शरसंधाण साधलं आहे.

“हा सत्तापिपासूपणा आहे”

“आपल्याबरोबर जे येतील, ते धुतले तांदूळ. आम्ही विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय. आत्तापर्यंत आमच्यातले जे लोक तुम्ही आरोप करून, चौकशीचा ससेमिरा लावून पक्षात घेतले त्यांच्यावर तुम्ही गोमूत्र शिंपडलंय का? ते शुद्ध झालेत का? ते शुद्ध झाले असतील, तर आज आमच्या लोकांच्या विरोधात तुम्ही लागले आहात, त्यांनीही तुमच्या पक्षात यायचं का? तसं झालं, तर तेही शुद्ध झाले असं जाहीर करणार का? हा सत्तापिपासूपणा आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.