Uddhav Thackeray | “… म्हणून भाजपने माघार घेतली”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजप पक्षाने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय निश्चित मानला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजप पक्षाच्या या निर्णायावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना आग्रलेखातून हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल –

यावेळी, आधी एक ना अनेक कारस्थाने व नंतर बराच ऊहापोह केल्यावर भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी श्री. शरद पवारांपासून राज ठाकरे यांनी फडणवीसांना विनम्र आवाहन केले व शेवटी भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करून अंधेरीतील उमेदवार मागे घेतला. अर्थात भाजपचे माघारी नाटय हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो. दुसरे म्हणजे भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात अनेक गफलती समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. या धोकादायक वळणावर भाजप आणि मिंधे गटाच्या गाडीस अपघात होणारच होता. त्या धोक्यातून सुटका करून घ्यायची म्हणून अचानक गाडीस ब्रेक मारून भाजपने ‘यू टर्न’ घेतला. तरी या निर्णयाबद्दल आम्ही संबंधितांचे आभार मानीत आहोत. मशालीची सुरुवात चांगलीच झाली. अंधेरीतील याच मशालीचा प्रकाश आता संपूर्ण राज्याला उजळून टाकेल. शिवसेना हा अस्सल मराठी बाण्याचा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि हिंदुत्वात पवित्र अग्निदेवतेचे विशेष स्थान आहे. यज्ञ, होमकुंडातील धगधगत्या अग्नीत समिधांची आहुती देऊन धर्मावरील, समाजावरील संकट दूर केले जाते. अंधेरीत तेच घडले. शिवसेनेच्या विजयी मशालीने या पोटनिवडणुकीतील संकटे व अमंगलाचा नाश केला. भाजप… कारस्थानी आनंदीबाई… माफ करा, कमळाबाईंनी बेइमान ‘मिंधे’ गटास हाताशी पकडून जो घाव शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते. आधी ऐटीत बेटकुळया फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले. अब्रू वाचावी म्हणून ‘झाकली मूठ…’ बंदच ठेवण्याचा भाजपायी मंडळींचा माघारीचा निर्णय हा महाराष्ट्रात एका त्वेषाने पेटलेल्या शिवसेनेच्या ज्वालाग्राही मशालीचा पहिला विजय आहे. बूड भाजण्यापेक्षा तोंड भाजलेले बरे म्हणून भाजपने दारुण पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी माघारीचा सोपा मार्ग निवडला. पण ‘सेफ पॅसेज’ शोधूनही जी बेअब्रू व्हायची ती झालीच! शिवसेनेचे कडवट तसेच निष्ठावान आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. शाखाप्रमुख, नगरसेवक आणि विधानसभेपर्यंत, असं त्यांनी लिहिलं आहे.

अनेक आंदोलनांत रमेश लटके यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, संघर्ष केला. लोकसेवेसाठी ते आयुष्यभर झिजले. ते असे अचानक आमच्यातून निघून जातील असे वाटले नव्हते; पण आमचे निष्ठावान, सतत हसतमुख रमेश लटके गेले हासुद्धा एक धक्काच होता. स्वर्गीय रमेश लटके यांच्या सुविद्य पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. खरे म्हणजे अशा दुःखद प्रसंगी राजकीय भेदाभेद विसरून, सगळय़ांनी एकत्र येऊन आधीच ही पोटनिवडणूक बिनविरोध करायला हरकत नव्हती, पण बिनविरोध करायचे राहिले बाजूला, ऋतुजा लटके यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी भाजप व मिंधे गटाची अभद्र हातमिळवणी झाली. मुंबई महापालिकेत नोकरी करणाऱ्या श्रीमती लटके यांचा नोकरीचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये व त्यांना निवडणूक लढवता येऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणे जिवाची बाजी लावली. “श्रीमती लटके यांचा राजीनामा मंजूर कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. ईडी- सीबीआय मागे लावू.” अशा अप्रत्यक्ष धमक्या देण्यात आल्याचेही मुंबई महापालिकेच्या प्रशासनात कुजबुजले गेले. खरेखोटे ‘ईडी’ सरकारलाच माहीत. शेवटी हे सर्व प्रकरण हायकोर्टात गेले व हायकोर्टाने याप्रकरणी सरकारच्या दाढीची खुंटे उपटली तेव्हा कोठे सगळे सुरळीत झाले. कारस्थानांचे टोक कसे, तर पालिकेच्या वकिलांनी सांगितले, “श्रीमती लटके यांच्याविरोधात म्हणे भ्रष्टाचाराची तक्रार असल्याने त्यांचा राजीनामा घाईघाईने मंजूर करता येत नाही.” यावर कोर्टाने विचारले, “तक्रार कधी आली?” पालिका म्हणते, “12 तारखेला… म्हणजे आजच ! ” हा सर्व प्रकार म्हणजे मूर्खपणाचा कळस होता. फडणवीस – मिंधे सरकारला डोळयासमोर पराभव स्वच्छ दिसल्यानंतर आता जे माघारीचे शहाणपण सुचले ते आधीच सुचले असते तर आज जी तोंड लपवायची वेळ आली ती आली नसती. आपला पती गमावलेल्या दुःखी महिलेच्या बाबतीत इतक्या खालच्या थरास आधीच जायला नको होते. भ्रष्टाचाराच्या तक्रारी, खटला असलेले अनेक ‘मिंधे’ फडणवीसांच्या सरकारात मंत्री म्हणून चरत व मिरवत आहेत. त्यांना काही अडथळे आले नाहीत. अनेकांवरचे भ्रष्टाचाराचे खटले घाईघाईने काढून घेऊन त्यांना ‘शुद्ध’ करून घेतले गेले; पण महापालिकेतील एका लिपिकेस बनावट तक्रारीच्या आधारे नाहक त्रास दिला. त्या त्रासातून अखेर मुंबईच्या उच्च न्यायालयास तिची सुटका करावी लागली. न्यायालयाने श्रीमती लटके प्रकरणात ‘मिंधे’ सरकारच्या काढले, असं देखील उद्धव ठाकरे यांनी आग्रलेखात म्हटलं आहे.

एका लिपिकेला राजीनामा द्यायचा आहे. त्यांना निवडणूक लढवायची आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. राजीनामा स्वीकारण्याचा तुमच्याकडे विशेषाधिकार असताना आमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचायलाच नको होते. हे केवळ राजीनामा पत्र आहे. एका लिपिकेने राजीनामा दिला आहे. त्यास ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर द्या. आमच्यावर भार का टाकता ? उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा” असे न्यायालय फटकारले तेव्हा पालिकेने शेवटच्या क्षणी राजीनामा मंजूर केला. आजच्या माघारीपूर्वी हे कारस्थान संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. श्री. फडणवीस यांचे सध्या करूनसवरून नामानिराळे राहण्याचे उद्योग सुरू आहेत. “सर्व काही नियमाने होईल मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील, कायदा सगळय़ांना सारखाच,” असे तुणतुणे ते वाजवीत असतात; पण या तुणतुण्याच्या तारा दसरा मेळाव्यापासून श्रीमती लटके यांच्यापर्यंत न्यायालयाने तोडल्या आहेत. शिवसेनेला ऊठसूट न्यायालयात जायला लावायचे. त्यात आमची शक्ती खर्ची पाडायची हे त्यांचे धोरण आहे. मिंधे गटास दूध पाजण्याचे हे प्रकार महाराष्ट्र • बघत असला तरी मराठी जनता दूधखुळी नाही. योग्य वेळ येताच महाराष्ट्राच्या या सर्व पुतना मावशींना जनता आपटणार आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे सरकार बेकायदा आहे व दिल्लीच्या बेकायदा आश्रयाने ते चालले आहे. त्यांचा मतलब इतकाच आहे की, शिवसेनेला खतम करा, महाराष्ट्राला कमजोर करा, मुंबईचे लचके तोडा. अर्थात, महाराष्ट्रात सुरू असलेला पैशांचा आणि सत्तेचा लाजिरवाणा खेळ संपविण्यासाठी शिवसेनेची मशाल आता पेटली आहे. या तळपत्या मशालीचा पहिला चटका आज भाजप व मिंधे सरकारला बसला. मशालीचे पावित्र्य आणि महत्त्व इतिहासकाळापासून आहे. दुष्मनांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी इतिहासकाळात मशालींचा वापर झाला होता. शिवरायांचे मावळे रात्री अपरात्री हाती मशाली आणि दिवटय़ा घेऊनच गनिमी काव्याने दुष्मनांवर हल्ले करीत असत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील योद्धय़ांच्या हातातही मशाल होती. मशाल म्हणजे न विझणारी, प्रेरणा देणारी धगधगती ऊर्जा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मारकावरही मशाल अखंड धगधगत आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र- दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील ! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल! मशालीच्या अग्निप्रकाशात भविष्यातील शिवसेनेचे तमाम विजयमार्ग आम्हाला स्पष्ट दिसत आहेत, असा हल्लाबोल सामना आग्रलेखातून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.