आयुक्तांच्या पहिल्याच भेटीत अधिकाऱ्यांस पाच हजार रुपयांचा दंड

औरंगाबाद, महापालिका आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडे यांनी सोमवारी (ता. ९) पदभार घेतला. यावेळी नव्या आयुक्तांचे स्वागत करण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. त्यात अधिकाऱ्यांना प्लॅस्टीकबंदीचा विसर पडला. शेवटी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून आयुक्तांनी या अधिकाऱ्याला प्लॅस्टीकबंदीची आठवण करून दिली.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक हे दीर्घ सुटीवर गेल्यामुळे व प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी विशेष लक्ष देत नसल्यामुळे महापालिकेचा कारभार ठप्प पडला होता.

त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधींनी महापालिकेला नियमित आयुक्त मिळावा अशी मागणी केली होती. राज्य शासनाने बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांची चार डिसेंबरला महापालिका आयुक्त म्हणून बदली केली होती. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. सकाळी आयुक्त दालनात येताच त्यांच्या स्वागताला अधिकाऱ्यांची गर्दी उसळली. आयुक्तांचे स्वागत करण्याच्या चढाओढीत अधिकाऱ्यांना प्लॅस्टीकबंदीचीही आठवण राहिली नाही. नगर रचना विभागाचे सहायक संचालक आर. एस. महाजन हे देखील आयुक्तांच्या स्वागतासाठी आले. त्यांनी आणलेल्या पुष्पगुच्छासोबत बंदी असलेली कॅरिबॅग होती. हा प्रकार लक्षात येताच आयुक्तांनी महाजन यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आयुक्तांचे स्वागत महाजन यांना चांगलेच महागात पडले.

आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर महापालिका मुख्यालयातील सर्वच विभागाची झाडाझडती घेतली. प्रत्येक विभागात स्वतः जाऊन काय कामे सुरू आहेत? काय प्रलंबित आहेत, याची माहिती आयुक्तांनी घेतली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महापालिकेला नियमित आयुक्त नसल्याने सुस्त झालेल्या अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी आयुक्तांच्या भेटीचा फटका बसला. अनेकांची फायली व्यवस्थित करण्यासाठी धावपळ सुरू होती.

महापालिकेची आगामी एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. कार्यकाळ संपत आला असला तरी अद्याप सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने नागरिकांना दिलेल्या वचननाम्यातील कामे अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण करण्याठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तत्कालीन आयुक्तांना वारंवार कामांची भली मोठी यादी दिली होती. मात्र कामे काही पूर्ण झाली नाहीत. दरम्यान सोमवारी नवे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी पदभार घेतल्यानंतर आयुक्तांनी पुन्हा एकदा प्रमुख कामांची यादी दिली. त्यात कर वसुली, घनकचरा, पाणी पुरवठा, रस्ते, स्मार्ट सिटी, आकृतिबंध अशा रखडलेल्या कामांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.