शिवसेना खासदार लोखंडेंकडून सामाजिक कार्यकर्त्यांना फसवण्याचा डाव ग्रामस्थांचा आरोप

श्रीरामपूर : शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बंगल्यात घुसून सुरक्षा रक्षकासह अंगरक्षकास शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई विनोद उंडे यांच्या फिर्यादीवरुन बेलापूर पोलिसांनी पाच जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांनी दिली.

साई खेमानंद फौंडेशन ट्रस्ट येथे सामाजिक कार्यकर्ते उदय लिप्टे (रा. पढेगाव) यांच्यासह आणखी चार जण काल (बुधवारी) रात्री गेले. त्यांनी लाथा मारुन बंगल्याचे दार उघडल्याने सुरक्षा रक्षक नीलेश शिंदे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत बंगल्यात प्रवेश केला. चारचाकी वाहनावरील कापड फाडून व्हिडिओ शुटिंग काढले. असे लोखंडेंच्या अंग रक्षकाकडून सांगण्यात आले आहे.

त्यानंतर लिप्टे यांनी खासदार लोखंडे यांच्या निवासस्थानाकडे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यास अंगरक्षक पोलीस शिपाई विनोद उंडे यांनी मज्जाव केला. मात्र, लिप्टे व त्यांच्या साथीदारांनी उंडे यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, असे पोलीस शिपाई उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही. अशा कठीण काळात खासदार लोखंडे यांनी पुढाकार घेवून त्यांच्या साई खेमांनद मेडीकल संस्थेमध्ये असलेल्या दोन नूतन रुग्णवाहिका पढेगाव-उंबरगाव परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय लिप्टे यांनी केली होती. त्याचा राग धरून राजकीय दबावातून लिप्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे बोगस गुन्हे दाखल करुन सामाजिक कार्यकर्त्यांना संपविण्याचा खासदार लोखंडे यांचा डाव असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा