Weather Update | राज्यात ‘या’ भागात ढगाळ वातावरण, तर ‘या’ जिल्ह्यात वाढली थंडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत चालला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर, कापूस, गहू इत्यादी पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकरी संघटना सापडला आहे. आधीच राज्यातील शेतकऱ्याला परतीच्या पावसामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडी चांगलीच वाढली आहे. जिल्ह्यात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत या भागात कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्या पेटवत आहे. नंदुरबारसह नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात सुद्धा थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 15 ते 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे.

राज्यामध्ये एकीकडे थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम जनसामान्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या