Weather Update | राज्यात वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थंडीचा कहर, तापमानात होणार आणखी घट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वातावरणात (Weather) बदल झाला आहे. या आठवड्यामध्ये देशात थंडीची लाट पसरली आहे. पुढचे आणखी काही दिवस देशामध्ये अशीच थंडी कायम असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. देशासह राज्यात देखील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यासह मुंबईमध्ये देखील थंडी वाढत चालली आहे. मुंबईमध्ये आज 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, रविवारी मुंबईत तापमान 15.6 अंश सेल्सिअस होते. राज्यामध्ये अनेक ठिकाणी 11 ते 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरली आहे. दरम्यान, येत्या तीन-चार दिवसामध्ये हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश मध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर भागातील अनेक ठिकाणी पुढील दोन दिवस थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, हिमालयातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे येत्या दोन ते तीन दिवसांत देशामध्ये तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये देखील अनेक जिल्ह्यात तापमानात घसरण झाली आहे. दरम्यान, थंडी वाढल्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील थंडीचा कडाका वाढत आहे. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात देखील थंडी वाढली आहे. ही वाढती थंडी रब्बी पिकांसाठी चांगली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या वाढत्या थंडीचा फायदा राज्यातील शेतकऱ्याला होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या