वेबसिरीजचे ‘सेन्सॉर’ आवश्‍यक; न्यायालयात याचिका

नेटफ्लिक्‍स, युट्यूबसारख्या वेबसाइट्‌सवर अश्‍लील दृश्‍ये व संवादांचा समावेश असलेल्या वेबसिरीज सर्रासपणे दाखविल्या जात आहेत. यामुळे समाजमनावर वाईट परिणाम होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचा मुद्दा जनहित याचिकेद्वारा उपस्थित केला आहे. ॲड. दिव्या गोंटिया यांनी ही याचिका दाखल केली आहे.

वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची ऐशीतैशी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. वेब सिरीजना पारंपरिक माध्यमांप्रमाणे कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे लागू नाहीत. त्यामुळे नेटफ्लिक्‍स, एएलटी बालाजी, यूट्यूब, हॉटस्टार, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, वूट, विमियो आदी वेबसाइटवर नवनवीन सिरियल्स प्रसारित केल्या जात आहेत. सेन्सॉरशिप नसल्यामुळे सिरियल्स मूळ स्वरूपात प्रेक्षकांना दाखविल्या जातात. बहुतांश वेब सिरियल्स नग्नता, अश्‍लील संवाद व हिंसक प्रसंगांनी भरलेल्या असतात. रंजकता वाढविण्यासाठी महिलांना चरित्रहीन दाखविले जाते. धार्मिक भावना भडकविणारे प्रसंग दाखविले जातात.

राजकीय नेत्यांना शिवीगाळ केली जाते. काही महिन्यांत प्रचंड लोकप्रियता वाढल्यामुळे मोठमोठ्या माध्यम कंपन्या वेब सिरियल्सची निर्मिती करीत आहेत, असे याचिकाकर्तीने विविध वेब सिरियल्सची नावासह उदाहरणे देऊन याचिकेत नमूद केले आहे. याचिकेवर १० ऑक्‍टोबरला सुनावणी होणार आहे. ॲड. श्‍याम देवानी याचिकाकर्तीची बाजू मांडतील.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.