शरद पवारांच्या भेटीनंतर काय घडलं?, साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे, असाही ते म्हणाले.

तसेच मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. शशिकांत शिंदे यांनी पराभवानंतर चौफेर टीका केली आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी पराभवावर चर्चा करण्यासाठी दस्तूरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे साताऱ्यात दाखल झाले आहेत.

साताऱ्याच्या विश्रामगृहात शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. साताऱ्यात जेव्हा 2019 विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला होता तेव्हा सुद्धा शरद पवार हेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले होते. आताही शरद पवार यांनी शिंदे यांच्या पराभवावर सुचक वक्तव्य केलं आहे. पक्षातील गटबाजीवर भाष्य करणं पवार यांनी टाळलं आहे.

मी लढणारा कार्यकर्ता आहे म्हणून या निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीत देखील मला पाडण्याचं षडयंत्र करण्यात आलं. आता मला राजकारणात काही गमवण्यासारखं राहिलेलं नाही. येत्या 25 तारखेला मी माझ्या राजकीय कारकीर्दीबाबत निर्णय जाहीर करेल, अशी घोषणा यावेळी शशिकांत शिंदे यांनी केली. त्यामुळे आता शशिकांत शिंदे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा