Winter Session 2022 | “यांना जर मस्ती चढली असेल तर…” ; सीमा मुद्द्यावरून जयंत पाटील विधानसभेत आक्रमक!

Winter Session 2022 | नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. आज पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. त्या अंतर्गत आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेला हल्ल्याचा मुद्दा सभागृहात जयंत पाटील यांनी उपस्थित केला. काल सीमाभागात मराठी बांधवांचे संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील एकही नेता पोहोचणार नाही, अशी व्यवस्था कर्नाटक सरकारने केली होती. माजी मंत्री हसन मुश्रीफ तेथील मराठी माणसांच्या समर्थनासाठी तिथे पोहोचले असता त्यांच्यावर लाठी उगारली गेली. हे अत्यंत चुकीचे आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत. त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले.

यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका असेही जयंत पाटील यांनी राज्यसरकारला सुनावले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.