उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

मुंबई, दि. २६ :- केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १३२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्य, साहित्य-शिक्षण, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग-व्यापार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सहा मान्यवरांना पद्मभूषण आणि ६ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.

राज्यातील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये हॉर्मुसजी कामा (साहित्य-शिक्षण-पत्रकारिता), आश्वीन मेहता (वैद्यकीय), राम नाईक (सार्वजनिक क्षेत्र), राजदत्त तथा दत्तात्रय मायाळू (कला), प्यारेलाल शर्मा (कला), कुंदन व्यास (साहित्य-शिक्षण) यांचा समावेश आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उदय देशपांडे, वैद्यकीय क्षेत्रासाठी मनोहर डोळे व चंद्रशेखर मेश्राम, साहित्य व शिक्षण क्षेत्रासाठी जहीर काझी, उद्योग व व्यापार क्षेत्रासाठी श्रीमती कल्पना मोरपारिया आणि सामाजिक कार्यासाठी शंकर बाबा पापळकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. या सर्वांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले, महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्राची मान देशात उंचावली आहे. या सर्व विजेत्यांच्या कर्तृत्वाचा आज योग्य सन्मान झाला. कर्तृत्ववान माणसांमुळे कोणत्याही राज्याची ओळख होत असते. महाराष्ट्राने आजवर देशाला किर्तीवंत माणसं दिली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, आज पुरस्कार प्राप्त झालेल्या प्रत्येकाने आपलं आयुष्य लोकहितासाठीसाठी समर्पित केलं आहे. वैद्यकीय, कला, साहित्य, सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींचा आजचा सन्मान सर्वांना अभिमान वाटणारा आणि आनंद देणारा आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्ती प्रेरणास्रोत म्हणून यापुढेही जनतेची सेवा करतील याची मला खात्री आहे. त्यांचा आदर्श तरुण पिढी घेईल आणि राज्याचं नाव मोठं करेल, असा मला विश्वास आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

000