कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्शन

मुंबई. दि. ४ : राजर्षी शाहू महाराज हे  लोकशाहीवादी व समाज सुधारक राजे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ निर्मिती करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तरुण पिढीला माहित व्हावे हा या मागील मुख्य उद्देश असून यानिमित्ताने दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी चित्ररथाचे प्रदर्शन ०५ मार्च, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे.

हा चित्ररथ कोल्हापूरमधील महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या प्रदर्शनाचे उद्धाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करणार असून या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे तसेच मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन चित्ररथ निर्मिती कामी लाभले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

000

 दीपक चव्हाण/विसंअ/