ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक

ठाणे, दि.04 (जिमाका) : देशात लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया येत्या 20 मे 2024 रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करायचे असून ही निवडणूक प्रक्रिया ही शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविण्यात आलेले काम हे गांभीर्यपूर्वक करावे, असे निर्देश भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघात दाखल झालेल्या सर्व निवडणूक निरीक्षकांनी तीनही लोकसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच पोलीस यंत्रणांना आज झालेल्या बैठकीत दिले.

            जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनातील समिती सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आज निवडणूक निरीक्षकांनी आढावा घेतला.

            या बैठकीस 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) जे.श्यामला राव (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) , 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन (आयएएस), खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) , आणि 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.राजनवीर सिंग कपूर (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चित्तरंजन धंगडा माझी  (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक के. जयरामन (आयपीएस) उपस्थित होते.‍ तसेच तीनही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. शिनगारे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांची माहिती उपस्थित निरीक्षकांना दिली. तसेच  भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील निवडणुकांसाठी राबविण्यात येणारी मतदान प्रक्रिया व त्यासाठी लागणारी यंत्रणा यांची माहिती सर्व निरीक्षकांना दिली.

            नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपापसात उत्तम समन्वय साधावा. त्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा बारकाईने अभ्यास करावा, असे निर्देश ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. राव यांनी यावेळी दिले.

            23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात संवेदनशील असलेल्या मतदार केंद्रांवर लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची आचारसंहिता कक्षाने गांभीर्याने काळजी घ्यावी. मतदारसंघात पुरेशा प्रमाणात व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतील व ते संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील, यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमने स्टार कॅम्पेनअरचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून ठेवावे. तसेच रॅली, प्रचारामध्ये विहीत परवानगी घेतलेली वाहनेच असतील. विनापरवाने वाहने आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही श्री. राव यांनी यावेळी दिले.

            पेड न्यूजचे प्रकार घडू नयेत यासाठी दररोजची वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनेल, सोशल मीडिया, आकाशवाणी केंद्र याद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवावे,असेही त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यत पेडन्यूजचे प्रकार घडले आहेत का याबद्दलची माहिती त्यांनी जाणून घेतली.

            लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत केलेल्या कारवाईची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले.

रेल्वेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत ठाणे रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचना खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल यांनी या बैठकीत दिल्या.

            मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष यांना त्या दिवशी सकाळपासून कोणकोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत उदा. मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत भरण्यात येणारे फॉर्म, त्यासाठीची प्रक्रिया, मॉक पोलिंग आदी कामाची चेकलिस्ट करुन ती सर्व मतदान केंद्रावर देता येईल का ते पाहावे. जेणेकरुन मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे जाईल. तसेच मनुष्यबळ व साहित्याची वाहतूक करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्याच्या सूचनाही सर्वसाधारण निरीक्षक श्री. जैन यांनी यावेळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या.

                  20 मे 2024 ही मतदानाची तारीख आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर पाणी, सरबत आदींची सोय होईल हे पाहावे. तसेच पाऊस पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, यासाठी ज्या ठिकाणी मंडप टाकून मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या ठिकाणी पावसाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळतील, यासाठीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना श्री. जैन यांनी यावेळी दिल्या.

            मतदान प्रक्रिया हे टीमवर्क आहे. शेवटच्या टप्प्यातील ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.के.जयरामन, कु.करुणागरन, श्री.मीना यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

                 बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

00000000000000