नमो महारोजगार मेळाव्यातील नोंदणीकृत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नमो महारोजगार मेळाव्यात ११०९७ उमेदवारांना नियुक्तीपत्रे

दोन दिवसांत ६३७८ उमेदवारांची नोंदणी ; ३२८३१ मुलाखती

महाराष्ट्रात अन्य ठिकाणीसुध्दा नमो महारोजगार मेळावे

नागपूर, दि.१० : आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा हा देशात अभुतपूर्व ठरला आहे. दोन दिवसीय या मेळाव्यात ६७ हजार ३७८ उमेदवारांनी नोंदणी केली असून यापैकी ११०९७ उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नोंदणी झालेल्या उर्वरीत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन परिसरात आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर  कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दटके, विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संचालक दिगांबर दळवी, शिवानी दाणी आदी उपस्थित होते.

नागपूर येथील नमो महारोजगार मेळाव्यात उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाह नोंदवून एक विक्रम केला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात सर्वाधिक रोजगार देणारा हा मेळावा ठरला आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाने विशेष पुढाकार घेतला असून सर्वांच्या मेहनतीने आणि समन्वयातून हा मेळावा यशस्वी ठरला आहे. मुलाखतीच्या माध्यमातून काही लोकांना प्रतिवर्ष 10 लक्ष रुपयांचे पॅकेज मिळाले असून ही नमो महारोजगार मेळाव्याची फार मोठी उपलब्धी आहे. विशेष म्हणजे विविध कंपन्यामध्ये रोजगार मिळालेल्या 11097 उमेदवारांना नाविन्यपूर्ण कल्पनेतून एकाच क्लिकद्वारे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

पुढे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आजही उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे  उद्योग कंपन्यांना मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी शासन दुवा म्हणून काम करेल. दोन दिवसीय या मेळाव्यात कॉऊंटर बंद झाल्यावरसुध्दा नोंदणी सुरूच होती. या नोंदणीच्या माध्यमातून कंपन्यांकडे उमेदवारांचा बायोडाटा जमा झाला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना बायोडाटाच्या आधारावर कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पाठपुरावा करावा. ज्यांना आज नियुक्तीपत्र मिळाले आहे, त्यांनी आपली गुणवत्ता सिध्द करून प्रमोशन घ्यावे, तर ज्यांना आजच्या मेळाव्यात नोकरी मिळाली नाही, अशा उमेदवारांसाठी शासनातर्फे आस्थापनांकडे पाठपुरावा सुरूच राहील, असेही श्री. फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी रिलायन्स, टाटा व अन्य काही आस्थापनांच्या सहभागासाठी सन्मान केला. नागपूरमध्ये मोठ्या संख्येने कंपन्या आल्याबद्दल आभार मानले.

दोन दिवसांत इतिहास घडला : मंत्री श्री. लोढा

नागपूर येथील नमो महारोजगार मेळावा हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला असून मेळाव्यामध्ये सहभागी कंपन्या आणि मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता दोन दिवसांत एक नवीन इतिहास नागपूरने घडविला, असे गौरवोद्गार कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले.

माझ्या पाच मुलांचा पगारच पाच कोटीपेक्षा अधिक !

नमो रोजगार मेळाव्याच्या खर्चासंदर्भात काहींना प्रश्न पडला आहे. म्हणे, पाच कोटीपेक्षा अधिक खर्च लागला. आज या ठिकाणी आम्ही पाच उमेदवारांना सहा ते दहा लाखांपेक्षा अधिक पॅकेजचे नियुक्ती पत्र दिले. या माझ्या मुलांचा पगारच ५ वर्षात ५ कोटींपेक्षा अधिक होईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागपूरचा हा नमो रोजगार मेळाव्याचा प्रयोग यशस्वी झाला असून अन्य विभागात व जिल्ह्यातही हे मेळावे घेण्यात येईल.

आस्थापना व बेरोजगारांसाठी मेळावे शासकीय प्लॅटफॉर्म

शासकीय नोकऱ्या शासन देण्याचा प्रयत्न करते.त्याबद्दलची माहिती शासनाकडे असते. मात्र,खाजगी आस्थापना कंपन्यांकडे असणाऱ्या जागांची माहिती घेऊन बेरोजगारांना माहिती देणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी यापुढे रोजगार मेळावे होतील.कौशल्य विकास विभाग हा यासाठीचा प्लॅटफॉर्म बनून काम करेल , असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपीटल : स्टार्टअप सुरू करण्यात महाराष्ट्र अन्य राज्यांपेक्षा पुढे आहे. आऊटलूक कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू झाले असून महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपीटल आहे. विशेषत: ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण, मार्केट लिंकेज देणारे स्टार्टअप देखील सुरू झाले आहे.

दोन दिवसात 32831 मुलाखती : नमो महारोजगार मेळाव्यात एकूण 67378 उमेदवारांची नोंदणी झाली. यात देशातील नामांकित 552 कंपन्यांनी सहभाग नोंदविला तर 38511 युवक-युवतींनी सहभाग घेतला. दोन दिवसात विविध कंपन्यांनी 32831 मुलाखती घेतल्या असून यापैकी 11097 उमेदवारांनी रोजगार उपलब्ध झाला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. संचालन प्रांजली बारसकर यांनी तर आभार दिगांबर दळवी यांनी मानले.

००००००