निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

सिंधुदुर्ग, दि. २८ (जिमाका):  मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन त्याची माहिती मतदारांना द्यावी, आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी  अधिकारी मकरंद देशमुख, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे तसेच सर्व समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

 श्री. चोक्कलिंगम म्हणाले, जिल्ह्यातील मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,  इपिक कार्ड घरोघरी जाऊन वाटप करा, जिल्ह्याच्या लगत असणाऱ्या चेक पोस्टवर विशेषत: बॉर्डर चेकपोस्टवर बारकाईने निगराणी ठेवा, वाहनांची काटेकोर तपासणी करा, सर्व चेक पोस्टवरील यंत्रणांमध्ये समन्वय ठेवा, मतदानाच्या दिवशी  मतदारांना सर्व आरोग्य विषयक सुविधा मिळणे आवश्यक आहे त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवा, आवश्यकतेनुसार सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करा, सर्व अहवाल विहित नमुन्यात आणि विहित वेळेत पाठवावे असेही त्यांनी सांगितले.

शहरी भागात मतदारांना मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी बारकोडचा उपयोग करावा, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे. कोठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना करा असेही ते म्हणाले.

निवडणुकीत पैसा, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषाचे वाटप तसेच बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. समाजमाध्यमाद्वारे चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, आदी सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री तावडे  यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. यामध्ये मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, आचार संहिता कक्षा तसेच इतर कक्ष करत असलेले कार्य, दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, परदानशीन पोलिंग स्टेशन आदींबाबत तसेच पोलीस विभागाच्या सहकार्याने निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक  श्री.अग्रवाल यांनी पोलीस विभागाने  केलेल्या तयारीची माहिती दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळ उपलब्धता याबाबत माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

000