पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

सोलापूर, दिनांक 1(जिमाका):- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. व जिल्ह्यात विविध धर्माचे, पंथाचे, वंशाचे, जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने, सलोख्याने एकतेच्या भावनेने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करुया, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.

 या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक, पत्रकार उपस्थित होते.

 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन. याच दिवशी महाराष्ट्राचा मंगलकलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे  राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्मांना ही श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात महान विभूतींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले.

000