प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण

मुंबई, दि. २६ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज             विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या भारतीय प्रजासत्ताकामध्ये सर्वसमावेशी चौफेर विकासाचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली गाठले जात असून या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचा देखील मोलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले. भारतीय राज्यघटना हा आपल्या सर्वाचा प्रेरणास्त्रोत आणि स्फूर्तिस्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

27 ते 29 जानेवारी, 2024 या कालावधीत विधान भवन, मुंबई येथे तीन दिवसांची अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची 84 वी परिषद आणि भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची 60 वी परिषद आयोजित करण्याचा बहुमान महाराष्ट्राला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेस   उपराष्ट्रपती  जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती श्री. हरिवंश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते उपस्थित राहतील. या परिषदेतील विचारमंथन देशातील संसदीय लोकशाही आणखी सशक्त करणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानपरिषदेचा शतकमहोत्सव …

             भारतीय प्रजासत्ताक आपला अमृत महोत्सव साजरा करीत असताना मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली विधानपरिषद आपला शतक महोत्सव साजरा करीत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अपूर्व योग असल्याचे विधानपरिषदेच्या मा. उपसभापती डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा देताना सांगितले. नवी दिल्ली येथे आज कर्तव्यपथावर झालेल्या संचलनाचे नेतृत्त्व महिलांकडे देण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार)  विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी  प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

०००