प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाच्या लक्षवेधी चित्ररथाचे सादरीकरण

मुंबई दि.२६ : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि  ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती.

राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत – ‘प्रति थेंब अधिक पिक’ यामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५  टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येते. पिकांच्या मुळाशी मर्यादित पाणी दिल्याने पिकांची जोमाने वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळते. पिकांच्या मुळाच्या भोवती पाणी, माती व हवा यांचा समन्वय साधला जातो. पाण्याच्या कार्यक्षम वापर होऊन जास्तीस जास्त क्षेत्र सिंचनाखाली येते.

कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब यामध्ये पिक आरोग्याची अचूक माहिती, उत्पादन तंत्रज्ञान, एकूण पिकांची  उत्पादकता, बाजारपेठेतील विविध दरांची माहिती, पीक संरक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजिएन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर, पीक कापणी प्रयोगाद्वारे अचूक उत्पादकता, विविध पीक विमा योजना तसेच योजना अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता व सुसूत्रतेसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध योजनांचा थेट शेतकऱ्यांना लाभ, पीक पेरा (ई – पिक पाहणी) योजना इत्यादी योजनांचे संकल्पना या चित्ररथाद्वारे मांडण्यात आली होती.

०००