‘महिला मतदार; मतदान करणार’ जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी विशेष मोहीम

छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये महिला मतदारांची मतदानासाठीची टक्केवारी वाढावी यासाठी महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी ‘महिला मतदार; मतदान करणार’ ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जाणार आहे

            जिल्ह्यात मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम स्वीप अंतर्गत राबविण्यात येत आहेत. त्यात महिला मतदारांपर्यंत विशेष करुन पोहोचता यावे यासाठी ‘महिला मतदार-मतदान करणार’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५० टक्के मतदार महिला आहेत.ज्या गावात महिला तलाठी व ग्रामसेवक असतील अशा महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे विशेष उपक्रम राबवावयाचे आहेत. याशिवाय इतर ठिकाणीही हे कार्यक्रम राबवावयाचे आहेत. ज्या गावात महिला अधिकारी- कर्मचारी आहेत त्यांनी अंगणवाडी ताई, बचतगटाच्या महिला यांच्या सहकार्याने उपक्रम राबवावयाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी नियोजन करावयाचे आहे. जनजागृती कार्यक्रमात चर्चासत्र, व्याख्यान, उखाणे, हळदी कुंकू वा तत्सम कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्यातून महिलांना मतदानाचे महत्त्व सांगावे. महिलांना मतदान केंद्रांवर महिलांसाठी केलेल्या सुविधांबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

०००००