मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

मुंबई, दि. 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली MH03EM ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी MH03EN नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल, त्यांना विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI) (EAST) किंवा आरटीओ, मुंबई (पूर्व) (RTO MUMBAI) (EAST) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह 2 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या 8 मे 2016 च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास हा नोंदणी क्रमांक देण्यात येईल. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात जावून अर्ज करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/