मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षण समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

मुंबई, दि. १६ : आपल्या दैनंदिन शासकीय कामकाजापेक्षा निवडणुकीचे काम जबाबदारीचे आहे. हे कामकाज करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घेवून निवडणुकीच्या कामास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे , असे कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी सांगितले.

निवडणूक विषयक नियमांचा अभ्यास करून प्रामाणिकपणे काम करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामे व कर्तव्ये समजून एकमेकांशी समन्वयाने काम करावे. निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण दिले जात आहे, या प्रशिक्षणाचा फायदा क्षेत्रीय स्तरावर दिसला पाहिजे. निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून घेवून दक्षतापूर्वक पार पाडावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी सांगितले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे खर्च  संनियंत्रणासाठी असलेल्या विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाकरीता निवडणूक विषयक कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे आणि निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड यांनी मार्गदर्शन केले.

श्री. पानसरे म्हणाले, खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहेत.

खर्च संनियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची देखील या कामात मदत घेतली जाते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहरचे  उन्मेष महाजन, वरिष्ठ लेखाधिकारी राजू रामनानी, उपसंचालक चित्रलेखा खातू यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यवाहीसाठी नियुक्त खर्च विषयक पथक प्रमुख, त्यांचे सहायक, सर्व सहायक खर्च निरीक्षक, मतदार संघनिहाय नियुक्त विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तर घेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

०००

शैलजा पाटील/विसंअ