मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक काळात जप्त रकमेबाबत दाद मागण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर

मुंबई, दि. ९  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत सामान्य जनतेला दाद मागण्याकरिता ०२२-२०८२२६९३ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, मुंबई शहराचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत मुंबई शहर हद्दीत पोलीस / भरारी पथक/ स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे जप्त केलेल्या रोख रकमेबाबत (निवडणूक प्रचारासंदर्भात नसेल / तक्रार दाखल नसेल तर) सर्वसामान्य जनतेला दाद मागण्याकरिता या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन श्री. सुरवसे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत जप्त केलेली रक्कम निवडणुकीसंदर्भात नसल्याचे दिसून आल्यास मुक्त करणेबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ३० – मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ व ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जप्तीबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जप्त वस्तू / रकमेबाबत निर्णय घेणार आहे. समिती मतदानानंतर ७ दिवसापर्यंत कार्यरत राहील.

0000

शैलजा पाटील/विसंअ/