विधानसभा इतर कामकाज :

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण – मंत्री उदय सामंत

नागपूर, दिनांक १२ – मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेखापरीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली. नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिव, नगरविकास -१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित्त – लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, सदस्य योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात येऊन याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

याशिवाय, नगरविकास विभागाच्या अनुषंगाने ठाणे शहरातील घनकचरा, पाणीपुरवठा, याबाबतही तक्रारी नसल्याचे सांगून ठाणे शहराला ५८५ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सूरज परमार गुन्हा प्रकरणी तपास सुरू असून याप्रकरणी अतिजलद तपास करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभेने आज नगरविकास विभागाच्या ५०१५ कोटी ११ लाख ९० हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच महसूल विभागाच्या ६३१ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांच्या, तर मदत व पुनर्वसन विभागाच्या ११२ कोटी ८४ लाख १ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच वन विभागाच्या ४२ कोटी ६१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ३०८० कोटी ७३ लाख रुपयांच्या तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ५४ लाख ९६ हजार रुपयांचे पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

00000

दीपक चव्हाण/निलेश तायडे/विसंअ/