वृद्ध, दिव्यांगांच्या पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे -राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि.९: रस्त्यावरील अपघातांमुळे मज्जासंस्थेला इजा होऊन देशात अनेक लोकांना कायमचे अपंगत्व येते. आगामी काळात देशातील वरिष्ठ नागरिकांची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. गंभीर अपघात तसेच वृद्धत्वामुळे येणारी गतिशीलतेवरील बंधने विचारात घेऊन आरोग्य सुविधा आणि दिव्यांग पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल भारतीय भौतिक उपचार व पुनर्वसन संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने हाजीअली येथे संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये राज्यपाल बैस यांच्या हस्ते विकलांग लहान मुलामुलींना आज व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी  शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध मज्जाविकार तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रमाणी, अखिल भारतीय भौतिक चिकित्सा व पुनर्वसन संस्थेचे संचालक डॉ.अनिल कुमार गौर, शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ.तुषार रेगे, मानद सचिव भूषण जॅक, डॉ अंजना नेगलूर तसेच संस्थेचे पदाधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.

देशात 2016 साली तयार करण्यात आलेल्या दिव्यांग विधेयकासाठी स्थापन केलेल्या संसदीय समितीचे आपण अध्यक्ष होतो, त्यावेळी आपण देशभरातील दिव्यांग व्यक्तींच्या अनेक संस्थांना भेट दिली होती. देशात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग लोक आहेत याची आपल्याला तोवर कल्पना देखील नव्हती, असे सांगून लहान मुलांमधील अपंगत्व चिंतेचा विषय असला पाहिजे तसेच त्यांना मुलांना सामान्य जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी मदत केली गेली पाहिजे, असे राज्यपाल यांनी सांगितले.

वाहतूक नियम न पाळल्यामुळे तसेच रेल्वे मार्ग ओलांडताना अनेक लोकांना गंभीर अपघात होऊन कायमचे अपंगत्व येते. नियमांचे पालन केल्यास अपंगत्व येणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

दिव्यांग पुनर्वसनासाठी शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या अनेक संस्थांची तसेच डॉ. रमाणी  सारख्या लोकांची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्यामुळे लहान मुले व मोठ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल असे सांगून राज्यपालांनी शांता सिद्धी ट्रस्टचे तसेच अध्यक्ष डॉ. रमाणी यांचे अभिनंदन केले.

०००