अनाथ मुलांसाठी गृह प्रकल्पांमध्ये प्राधान्य हवे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि. १३ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अनाथ मुलांसाठी विशेष प्राधान्य असावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज राष्ट्रीय स्तरावरील बेघर मुलांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे व जीवन संवर्धन फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. या परिषदेचा विषय ‘फ्रॉम स्ट्रगल टू स्ट्रेंथ नेविगेटिंग आणि नेटवर्किंग फॉर होमेलेस चिल्ड्रेन’ हा होता.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात मुलांची बेघर होण्याची विविध कारणे विशद केली. त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीमध्ये मुले आणि महिला मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होऊन अनेकदा बेघर होतात. तसेच कौटुंबिक भेदभाव, हिंसाचार, कौटुंबिक आर्थिक समस्या, कुटुंबामध्ये असणारी असुरक्षितता यामुळे सुद्धा मुले बेघर होतात, असे सांगितले.

अनाथ व बेघर मुलांची अनेकदा तस्करी होते. या मुलांचा अनेक घातक व्यवसायात कामगार म्हणून गैरमार्गाने कामांमध्ये वापर केला जातो. मुलींना विविध कारणाने व विविध अमिषे दाखवून पळवून नेले जाते व त्यांचे विविध प्रकारे शोषण केले जाते. अनेक बालगृह आणि आश्रम शाळांमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत असतात. समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

तसेच लहान मुलांचे संदर्भात काम करणाऱ्या शासकीय व सेवाभावी संस्था यांच्या कर्मचा-यांचे सक्षमीकरण करणे, लहान मुले व महिलांच्या कायद्याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. गिरीष प्रभुणे, रवींद्र गोळे, डॉ. गणेश भगुरे, कमलेश प्रधान उपस्थित होते.

०००