उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते चतु:शृंगी परिसरातील दीड कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजऩ़

पुणे, दि. १३ : चतु:शृंगी परिसरातील १ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना मंदिराचे दर्शन सोपे व्हावे याकरीता सरकत्या जिन्याची (एक्सिलेटर) व्यवस्था करण्यात येईल,असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, मंदिर देवस्थानचे विश्वस्त नंदू अनगळ, उद्योजक कृष्णकुमार गोयल, माजी नगरसेवक आदित्य माळवे, शाम सातपुते, रवी साळेगावकर, दत्ता खाडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पुण्यातील चतु:शृंगी देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी देवीचे प्रतिरुप म्हणूनही चतु:शृंगी देवीला ओळखले जाते. त्यामुळे शारदीय नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

चतुःश्रृंगी देवीचे मंदिर हे डोंगर माथ्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना देवीच्या दर्शनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची ही अडचण दूर व्हावी; यासाठी मंदिर परिसरात सरकत्या जिन्याकरीता (एक्सिलेटर) तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंदिर देवस्थान समितीला केल्या. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करुन किंवा लोकसहभागातून यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.

जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना श्री.पाटील यांनी चतु:शृंगी मंदिर परिसरातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.