नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत

नांदेड दि. २६ : लोकसभा मतदानादरम्यान आज रामतीर्थ येथे झालेल्या ईव्हीएम तोडफोडीनंतर या ठिकाणच्या व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट बदलण्यात आले. इव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

आज निवडणूक मतदान सुरू असताना देगलूर विधानसभा क्षेत्रातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एका मतदाराने ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट थोडे क्षतीग्रस्त झाले. तथापि, कंट्रोल युनिटवर कोणताही परिणाम झालेला नाही. घटनेनंतर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तातडीने व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट बदलण्यात आले.

या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. कंट्रोल युनिटवर कोणताही परिणाम झाला नसल्यामुळे आधी झालेल्या मतदानाला कोणताही धोका नाही. तसेच संपूर्ण सेट अर्थात व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट बदलण्यात आल्यामुळे नव्या यंत्रांसह तातडीने मतदानाला सुरुवात झाली. ज्या मतदाराने ही तोडफोड केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

०००