निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे, दि. 06 जिमाका – 23, भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत  निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व  उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यावर सर्व उमेदवारांची स्थायी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय खर्च विषयक निरीक्षक चित्तरंजन माझी, केंद्रीय सर्वसाधारण  निवडणूक राजनविर सिंग कपूर  उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी नमूद केले की,  निवडणुकीचे कामकाज हे एकदम चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरता सर्व उमेदवारांचे सहकार्य अपेक्षित आहे. उमेदवाराने प्रचाराच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेणे कामी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारची  परवानगी न घेता प्रचार केल्यास नियमानुसार कारवाई करणार असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला.

या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी  संजय जाधव यांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षीय प्रतिनिधी, उमेदवार  यांना सूचना केल्या की,  निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार  उमेदवार व राजकीय पक्षाने तीन वेळा प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडिया मधून उमेदवाराची माहितीचे जाहीर प्रकटन करणे आवश्यक आहे. निवडणुकीकरीता उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडावे व त्या खात्यातून सर्व निवडणूक खर्च करावा. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लाख आहे. उमेदवाराने केलेला सर्व खर्च केंद्रीय निवडणूक निरीक्षक तपासतील. उमेदवाराचा प्रचार सभा, रॅली याचे सर्वांचे व्हिडीओ शुटींग करण्यात येणार आहे. उमेदवाराला प्रचारासाठी लागणारी सर्व प्रकारची वाहने वापरणेकामी  पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहनाचा खर्च हा स्वतंत्रपणे दाखवणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी निवडणूक निर्णय़ अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच सर्व सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी किमान तीन दिवस आगोदर अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषावर सर्व  परवानग्या देण्यात येतील. उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी ईव्हीएम मशीन आणतेवेळी, स्ट्राँग रूम मध्ये ठेवताना उपस्थित राहू शकतात.  कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य प्रसिध्द करणेकामी निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच समाज माध्यम (सोशल मिडीया)  व इलेक्ट्रानिक मिडीयावर प्रचार करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. पूर्व परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे प्रचाराचे साहित्य प्रसिध्द करण्यात येऊ नये, तसेच कोणतीही परवानगी नसताना कोणतेही  वाहन वापरता येणार नाही किंवा तसेच कोणताही प्रचार करता येणार जर नियमांचे व कायद्यांचे उल्लघंन झाल्यास त्या उमेदवार व पक्षावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.

केंद्रीय खर्च विषयक निरीक्षक चित्तरंजन माझी यांनी उमेदवाराने सर्व खर्च व्यवस्थित ठेवणे अपेक्षित असून सर्व उमेदवार यांच्या खर्चाची प्रथम  तपासणी 9 मे, द्वितीय तपासणी 14 मे आणि  तृतीय तपासणी 18 मे रोजी होणार असल्याची माहिती चित्तरंजन माझी यांनी या बैठकीत दिली. तर सर्वसाधारण केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजनवीर सिंग कपूर यांनी सांगितले की, निवडणुकीच्या बाबतीत जर  तक्रार  करून तक्रारीची दखल घेत नाही,  असे निदर्शनास आल्यावर केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्याशी आपण मेलवर तक्रार  शकता. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या प्रकारे पार पाडणे, ही आपणा सर्वांची आता जबाबदारी आहे असेही देखील त्यांनी नमूद केले. मुख्य निवडणूक कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे त्याचा नंबर असा आहे 1800 233 1114 या नंबरवर तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मेलवर आपण तक्रार नोंदवू शकता अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

0000000