६.४० कोटींच्या कर चोरीप्रकरणी जीएसटी विभागाकडून दोन संचालकांना अटक

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणात ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरु असलेल्या घडक मोहिमेअंतर्गत कमलेश बाबुलाल जैन (वय ६१), आणि भावना कमलेश जैन (वय ६१) या दोन संचालकांना आज १६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली, अशी माहिती राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

मे. मोनोपोली इनोव्हेशन्स प्रा.लि. या कंपनी विरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी व विक्री दाखवून ६.४० कोटी रुपयांची महसूल हानी केली आहे. या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवुन ३.२३ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसेच, मालाशिवाय फक्त बिले देवून ३.१७ कोटी रुपयांची शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.

महानगर दंडाधिकारी यांनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त  प्रेरणा देशभ्रतार आणि राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त डी. के. शिंदे यांनी राबविली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहीले.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात पहिल्याच अटक कारवाईद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

००००

पवन राठोड/ससं/