BJP | सत्यजित तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार?; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

BJP | मुंबई : माजी काँग्रेस नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा दोन-चार दिवसांत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला त्याबाबत विनंती केली असून लवकरच हा पक्षप्रवेश होईल, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसने नाशिकमधून विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. पण त्यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने या प्रकाराची पक्षाने दखल घेऊन दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. सत्यजित हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. पण त्यांचे मामा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा त्यास विरोध होता.

सत्यजित तांबे यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ‘अशा चांगल्या माणसांना मोकळे ठेवू नका, नाहीतर आमचा डोळा राहतो. चांगले नेते भाजपला हवेच आहेत, असे सूचक वक्तव्य केले होते. फडणवीसांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसने सत्यजित यांना उमेदवारी न देता वडिलांना दिल्यावर भाजपने सत्यजित तांबे यांना पक्षप्रवेशाबाबत विचारले होते. पण उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत निर्णय न झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने अधिकृत उमेदवारही या ठिकाणी दिलेला नाही.

दरम्यान,भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेनुसार कोणत्याही अन्य पक्षातील नेत्याला उमेदवारी हवी असेल, तर पक्षात प्रवेश देऊन भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढावे लागते. पण आता ते शक्य नसल्याने भाजपचा पाठिंबा हवा असेल, तर सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. सत्यजित यांचे वडील सुधीर तांबे यांचा मात्र सध्या तरी भाजपमध्ये प्रवेश होणार नसल्याचे समजते. त्यामुळे आता सत्यजित तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत संभ्रम आहे.

महत्वाच्या बातम्या :