Ajit Pawar | सरकारनं आता तरी गांभीर्यानं विचार करायला हवा; समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून राज्य सरकारला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या अपघातानंतर शासनाने आता तरी गांभीर्याने विचार करायला हवा असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Ajit Pawar’s tweet on the horrific accident on Samriddhi Highway

ट्विट करत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा – सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे.

अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी करतो.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46swnhh