Maharashtra Weather Update | राज्यात थंडीसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (Rain) आणि धुक्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाकाही वाढला आहे. आज (2 फेब्रुवारी) राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्यात थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. उत्तर भारतात सक्रिय असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील काही भागात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे.

राज्यामध्ये अनेक ठिकाणी किमान तापमान 13 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचले आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून दुपारच्या वेळी उन्हाचा तडाका जाणवत आहे. राज्यात रत्नागिरीमध्ये उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

दरम्यान, तमिळनाडूतील दक्षिण भागासह केरळमधील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तामिळनाडूतील समुद्रकिनारी भागामध्ये आज हवामानाची परिस्थिती बिघडू शकते. या ठिकाणी अनेक भागात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. त्याचबरोबर मध्य प्रदेशातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसू शकतात.

महत्वाच्या बातम्या