Sharad Pawar | शरद पवारांनी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले – जयंत पाटील

Sharad Pawar | सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पवारांच्या राजीनाम्यानंतर काल (5 मे) मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे अशी विनंती समितीने केली. या विनंतीला मान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सांगली येथे बोलत असताना जयंत पाटलांनी विरोधकांना खोचक टोला मारला आहे. “शरद पवारांनी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात घालते होते”, असा अप्रत्यक्ष टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. “आम्ही सर्वांनी विरोध केल्यानंतर शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला आहे. आता आम्ही पुन्हा एकदा नव्याने चांगली सुरुवात करणार आहोत”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पवार साहेबांना हा निर्णय मागे घ्यायला लावला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. पवार साहेबांच्या विचारांमुळेच आपण महाराष्ट्रातील अनेक प्रश्न सोडवू शकतो.”

दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना कार्यकर्ते अधिक आक्रमक आणि भावुक झाले होते. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पवार (Sharad Pawar) यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला.

महत्वाच्या बातम्या