#Union_Budget 2023 । अर्थसंकल्पावर ठाकरे गटाच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले “हे जे महाभाग…”

#Union_Budget 2023 । मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. किसान योजनेच्या अंतर्गत ११ लाखांचे आकडे केंद्र सरकारने सांगितले होते, ते खोटे आहेत असा आरोप ठाकरे गटाच्या खासदारांनी केला आहे.

यावर फडणवीस म्हणाले, “हे जे महाभाग तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात, शिवसेनेचे खासदार त्यांना आकडे माहीत नाही, त्यांना एकच आकडा समजतो तो कोणता आकडा आहे हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. त्यांना तोच आकडा समजतो. मूळ रूपात शेतकऱ्यांना आपण जो पैसा देतो, तो डीबीटीद्वारे देतो. डीबीटीमध्ये आकड्यांची हेरफेरच होऊ शकत नाही.”

“विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं, की कसंही बजेट आलं तरी काय प्रतिक्रिया द्यायची. सकाळीच लिहून ठेवलं होतं. तीच स्क्रीप्ट ते वाचत आहेत. त्यांनी बजेट बघितलंही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही”, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

काय म्हणाले विनायक राऊत?

“शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करताना शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याचं यापूर्वी सूचित केलं होतं. शेतकऱ्यांच्या दुप्पट झालेल्या उत्पन्नाला योग्य तो बाजारभाव देण्यासाठी ठोस उपाय योजना करायला हवी होती, ती केली गेली नाही”, असे केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना विनायक राऊत म्हणाले. “5 वर्षापूर्वीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात येत्या पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलिअन डॉलरपर्यंत जाईल, असं जाहीर केलं होतं. यावेळी मात्र त्यांनी जाणुनबुजून उच्चार केला नाही. आता अदाणीमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने घसरत आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे 5 ट्रिलिअनचा टप्पा नेमका किती गाठला? हे सांगण्याकडे अर्थमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं. तसेच जीएसटी करदात्यांना अनेक प्रकारे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, जीएसटी सेक्शन 16/4 मध्ये ज्या जाचक अटी आहेत, यामुळे लघु व्यापाऱ्याला खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय, त्यावर योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, संबंधित उपाययोजना या अर्थसंकल्पात केल्या नाहीत,” अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :