Prakash Ambedkar | “सगळं विकून झालं की दारूडा घरपण विकतो, नरेंद्र मोदी तेच करतायत” – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | पुणे : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. पुण्यातील खडकवासला येथे आयोजित केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, “देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे. आगामी कालावधीत ही भीती आपल्याला दूर करायची आहे.”

“माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात देशातील सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवले होते. मी अनेकवेळा विचारलं ते सोनं परत आणलं का? पण त्यावर कुणी उत्तर देत नाही. यावरुन देशाची परिस्थिती काय आहे ते बघा. आपल्या घरातलं सोनं जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही. त्यावरुन आपले घर आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो”, असं सांगतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  टीका केली.

“एखादा दारूडा अशावेळी घरातली भांडीकुंडी विकून घर चालवतो. सगळं विकून झालं की दारूडा आपलं घरही विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी नेमके तेच करतायत की नाही सांगा?”, असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे मात्र कौतुक केले. नेहरू यांनी अत्यंत कष्टाने देश उभा केला असे सांगताना ते म्हणाले की, डॉ. होमी भाभा यांच्या संशोधनाच्या आधारावर नेहरूंनी देशात कारखाने उभे केले. तेच कारखाने आज भारताचा आर्थिक कणा आहेत. मात्र तेच कारखाने मोदी दारूड्यासारखा विकायला लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या :