Sandipan Bhumre | “त्याची उंची किती, तो बोलतो काय”; आदित्य ठाकरेंच्या टीकेवर संदिपान भुमरेंचा पलटवार

Sandipan Bhumare | औरंगाबाद :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पैठणच्या बिडकीन येथे घेतलेल्या सभेतून शिंदे गटाचे मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर टीका केली होती. यावरुन आता संदिपान भुमरे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

“आदित्य ठाकरे माझ्या नातवासारखा”

“आदित्य ठाकरे बोलतो काय, त्याची उंची किती, तो आमच्या नातवा सारखा आहे. पण तरीही आम्ही त्यांचा मान ठेवतो. मात्र तो आम्हाला आरे तुरे करतो. जरी तो आमचा नेता असेल, पण माणसाने मान सन्मान ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपल्या वयामानाने बोलले पाहिजे”, असे संदिपान भुमरे म्हणाले आहेत.

“इथं आला अन् एका बोळीत सभा घेतली”

“विकासकामे होत नसल्याने आम्ही उठाव केला होता. जरी आम्हाला खोके म्हणत असाल, बोके म्हणत असाल, पण यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं काहीच नाही. गद्दार आणि खोके याशिवाय यांच्याकडे कोणताही इतर विषय नाही. काल आदित्य ठाकरे बिडकीनला आला आणि एका बोळीत सभा घेतली. तालुक्यात माझी आज सहावी सभा आहे. आदित्य ठाकरे यांनी तालुक्यात तीन सभा घेतल्या, सुषमा अंधारे यांची एक सभा झाली. रोहित पवार यांची एक सभा झाली आणि आज अजित पवार यांची सभा आहे. पण तुम्ही सगळे जरी आलात आणि कितीही सभा घेतल्या तरीही इथे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही”, असे संदिपान भुमरे म्हणाले आहेत.

“आम्ही उठाव केला की लगेच…”

“विरोधकांना कितीही आरोप करू द्या, साधे ग्रामपंचायत सदस्य लवकर फुटत नाही. पण आम्ही 50 आमदार गेलो, 13 खासदार गेलो. त्यामुळे यांनी चिंतन करायला पाहिजे. आपल्या जवळील 50 आमदार कसे काय गेले. लोक पैशाने जात नसते. आम्ही जो उठाव केला त्याचं कारण म्हणजे, गेली अडीच वर्षे हे घरातून बाहेर निघाले नव्हते. पण आम्ही उठाव करताच आदित्य ठाकरे तीन वेळ पैठणला येऊन गेले. पण माझं त्यांना आवाहन आहे की, गद्दार आणि खोके सोडून तुम्ही कामे काय केले हे सांगावे”, असे संदिपान भुमरे म्हणाले आहे.

“आम्हीच ओरिजनल बाळासाहेबांची शिवसेना”

ठाकरे गटात किती लोक राहिले आहे. त्यांच्याकडे 15-16 आमदार राहिले आहेत. मात्र त्यातील देखील अनेकजण आमच्या संपर्कात असून, ते आमच्याकडे येणार आहे. आम्ही ओरिजिनल बाळासाहेबाच्या शिवसेनेचे आहोत. आम्हीच खरे असून, आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. आपण सर्वांनी संघटना वाढवली असून, आपणच बाळासाहेब यांच्या विचाराचे आहोत, असा दावा शिवसेनेवर संदिपान भुमरेंनी दावा केला आहे.

आदित्य ठाकरेंची टीका

महाराष्ट्राला आम्ही सुवर्णकाळ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना, कोणाच्यातरी पोटात ते दुखत होते. त्यामुळे त्याने या 40 गद्दारांना सोबत घेऊन गद्दारी करायला लावली, उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसायला लावला. बरं सरकार पडल्यावर लोकशाही पद्धतीने हे 40 गद्दार राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती. पण असे झाले नाही आणि निवडणूक लागली नाही. यांनी घटनाबाह्य सरकार बनवली. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. एक-दोन महिने आपल्याला त्रास सहन करावा लागणार असून, आज ना उद्या हे चाळीश गद्दार बाद होणारच, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-