Devendra Fadanvis | “…आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला”; फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Devendra Fadanvis |  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जाते. दरम्यान, मागील वर्षी एका संयुक्त पत्रकार परिषदेत, प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीसांनी अचानक मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरचा माईक काढून स्वत:कडे घेतला होता. यावर देखील विरोधकांनी चांगलंच तोंडसुख घेतलेलं पाहायला मिळालं. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

रिमोट कंट्रोल नक्की कुठे आहे? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा रिमोट कंट्रोलचा पक्ष नाहीच, हा समन्वयचा पक्ष आहे. तुम्ही विषय काढला आहे म्हणून सांगतो, की तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ काढला माईकच्या संदर्भातला. तर पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यांनंतर मुख्यमंत्री शिंदे उत्तर द्यायला लागले तेवढ्यात पत्रकार म्हणाले नाही हा प्रश्न तुम्हाला नाही, हा फडणवीसांना आमचा प्रश्न आहे आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला.”

“पण त्यासंदर्भात तेवढच दाखवण्यात आलं की त्यांच्या समोरचा माईक मी घेतला आणि ते चालवलं. त्याने काही फारसा फरक पडत नाही. बरं झालं उद्धव ठाकरेंना एक कॅसेट मिळाली, ते वाजवत आहेत ती कॅसेट. पण त्याने काही फार फरक पडत नाही”, असा म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.

पुढे ते म्हणाले, “कुठलाही रिमोट कंट्रोल नाही. सरकारमध्ये एकच नेता असतो, तो नेता म्हणजे मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सगळ्यांना काम करायचं असतं. मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा कोणी नाही, त्यामुळे मुख्यमंत्री ठरवतील त्या हिशोबाने सरकार काम करत असतं आणि मला हे पक्क माहिती आहे कारण मी मुख्यमंत्री होतो.”

महत्वाच्या बातम्या :