Aditya Thackeray | महाविकास आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आहे – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | माथेरान: सध्या राज्यातील राजकारणामध्ये दररोज नवीन घडामोडी घडत आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) राजीनामा, उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा अशा अनेक घडामोडींवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशात आदित्य ठाकरे आज माथेरान दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बारसूमध्ये होणारा रिफायनरी प्रकल्पाचा वाद सध्या चांगलाच पेटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोकणामध्ये येऊन दाखवावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “या अशा आव्हानांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही. सभेला परवानगी न देणे ही हुकूमशाही आणि दादागिरी आहे. ते आमच्यावर हुकूमशाही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहे, तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई अशीच पुढे चालू राहणार आहे.”

आदित्य ठाकरे यांना अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. जसे गद्दार खुर्चीसाठी एकत्र आले आहेत, तसे आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलो नाही.”

दरम्यान, उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर त्यांनी रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधला आहे. ग्रामस्थांचा विरोध असताना हा प्रकल्प होणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या